साधा क्रिकेटचा सामना हरण्यापासून निवडणुकीत झालेल्या पराभवापर्यंत अनेक ठिकाणी ' पानिपत झाले ' हा वाक्प्रचार सहजपणे वापरला जातो. पण इतिहासाची पाने नीट अभ्यासली की कळते की पानिपतावर जे घडले तो फक्त पराभव नव्हता, तर त्यात भविष्यातल्या राष्ट्रनिर्मितीची बीजे रोवलेली होती.
इव्हॅन्स बेल या विचारवंत इतिहासाभ्यासकाने संशोधनकालापूर्वीच लिहिले की, '' पानिपताची लढाईसुद्धां मराठ्यांना अभिमानास्पद व कीर्तिस्पद अशीच घटना समजली पाहिजे ! मराठे ' सर्व हिंदी लोकांसाठींच हिंदुस्थान ' या ध्येयासाठी लढले ! पण दिल्ली, अयोध्या व दख्खन येथील प्रबळ मुसलमान सत्ताधीश मात्र या वेळी कारस्थाने करीत, आपल्या चैनीत दंग होऊन एका बाजूस बसले ! आणि जरी मराठ्यांचा या युद्धात पराजय झाला तरी विजयी अफगाण जे यानंतर एकदां परत गेले ते हिंदी राजकारणांत ढवळाढवळ करण्यासाठी पुनः कधी दिल्लीस आले नाहीत !''
ज्या सेनापतीला जय मिळतो त्याने सर्वात कमी चुका केल्या असे समजले जाते. पण वेलिंग्टन व नेपोलियन या दोघांनीहि वॉटर्लूच्या लढाईत घोडचुका केल्याचे जे नमूद आहे, त्यांच्या दशांशाहि चुका भाऊसाहेबांच्या हातून घडल्या नव्हत्या. भाऊच्या पराजयाचे कारण तो वाईट सेनानी होता हे नसून, त्याचा प्रतिस्पर्धी त्याहून जास्त चांगला सेनापति होता, हेच आहे.
सदाशिवरावभाऊ हा तत्कालीन मराठ्यांतील सर्वात जास्त कार्यक्षम, हुशार, तडफदार पुरुष मानला जात होता ; पण त्याचे दोन दोष इंग्रज वकील स्पेन्सर याने पानिपतापूर्वी चार वर्षे ओळखले होते. ते म्हणजे सबुरी नसणे व अतिरिक्त हाव. इंग्रज वकिलाने सांगितलेला सबुरी नसण्याचा दुर्गुण अज्ञानजन्य होता, असे आम्हाला वाटते. पेशव्यांची, किंबहुना, सर्व मराठ्यांची शिक्षणपद्धती अत्यंत तोकडी होती. सर्व हिंदुस्थानाचे राज्य झपाटण्यास जे उद्युक्त झाले होते, त्यांना तत्कालीन इंग्रजांइतकेही हिंदुस्थानाच्या भूगोलाचे ज्ञान होते, असे दिसत नाही.
युरोपात हिंदुस्थानाच्या आकाराचे स्वरूप चित्ररूपाने दाखविणारे जे नकाशे शतकापूर्वीच फैलावले होते, ते पेशव्यांनी पाहिलेले किंवा ऐकिलेलेसुद्धा नसावेत. भरतखंडात मुंबई, मद्रास किंवा कलकत्ता या एकमेकांपासून फार दूर असणा-या एकटाच इंग्रज एकसमयावच्छेदेकरून कसा उमटतो, याची कल्पना नकाशांच्या अभावी मराठ्यांस नव्हती. त्यामुळे ही मराठी राज्याच्या गळ्याभोवती एकच सलग तांत ओढली जात आहे, याची जाणीव त्यांस झाली नाही.
तीच गोष्ट अबदालीच्या सामर्थ्याची. फारसी भाषेच्या संपर्कामुळे रूमशाम ही नावे मराठी उच्चारीत ; पण त्यांना या ठिकाणांचा भौगोलिक बोध मुळीत होत नव्हता. अखबारनविसांची येणारी फारशी बातमीपत्रे ते ऐकत ; पण मराठवाड्यांतील आपले गाव सोडून कधीच बाहेर न गेलेल्या विद्वान पुरुषासह समुद्राची खरी कल्पना जशी येऊ शकत नाही, तशीच पेशव्यांना आशिया खंडाची किंवा जगाची कल्पना करता येत नव्हती, असे त्यांच्या लिखाणावरून व आचरणावरून स्पष्ट दिसते.
हिंदुस्थानातील मुसलमानी राज्ययंत्र त्यांनी इतके खिळखिळे केले होते की, कोणत्याही प्रदेशात तेथील प्रजेने बंड करून उठून मुसलमान सुभेदारास हांकून द्यावे व स्वतःचे राज्य स्थापावे. या कामांत त्यांस मराठ्यांची मदत आपोआप मिळाली असती आणि हीच शिवछत्रपतीनिर्मित मराठी राज्याची इतिकर्तव्यता होती ! इतर प्रांतातील लोकांत हे लोण जाऊन पोहोचू शकले नाही, हीच मराठ्यांच्या इतिहासातील खरीखरी शोककथा होय, पानिपताचा पराभव नव्हे !
0 comments:
Post a Comment